नगर: महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना रस्त्याने फिरणेही अवघड झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही.
नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शहरातील नागरी प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.
शहरात दैनंदिन सुविधांचा व स्वच्छतेचा अभाव आहे. प्रमुख रस्ते अस्वच्छ असून अनेक वसाहतीत कचरा उचलला जात नाही. कचऱ्याचे ढिग तातडीने न उचलल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी साथीचे आजार असलेले रुग्ण आढळून येत आहेत.
मोकाट जनावरेही रस्त्यांवरच आहेत. उपनगरांत सुमारे ८० टक्के परिसरातील पथदिवे बंद आहेत. कामकाज पाहण्यासाठी सक्षम अधिकारी नाहीत. अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाययोजना न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही आमदार जगताप यांनी दिला.