नगर – सोलापूर महामार्ग झाला मृत्यूमार्ग, धुळीच्या साम्राज्याने आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मिरजगाव : नगर – सोलापूर राज्य महामार्गाची दूरवस्था झाल्याने पावसाने झालेल्या खड्डयांतून काढले आणि धुळीत टाकले, अशी गत मिरजगावकरांची झाली आहे. या राज्य महामार्गाची दूरवस्था झाल्याने अपघातांची संख्या वाढली असून, रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून ज़ावे लागत आहे तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

महामार्गावरील खड्डयांमुळे व धुळीच्या साम्राज्यामुळे महामार्ग परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतरही खड्डे बुजवण्यात आले नाहीत. याबाबत संबंधीत विभागाकडे तक्रारी करूनही हा प्रश्न भिज़त पडला आहे.

पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे डांबरीकरण केलेला रस्ता वाहतुकीमुळे खड्डेमय झाला होता. परंतू हे खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रित मुरूम वापरल्याने सध्या रस्त्यावर मोठया प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे.

अनेक शाळा व कॉलेज रस्त्यालगत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गावर झालेली अतिक्रमणे व रस्त्यालगत गटार आणि रस्त्याच्या साईडपट्टया गायब झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

मागीलवर्षी २५ लाख रुपये खर्चून खासगी ठेकेदारामार्फत एक किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले ; परंतू या कामाकडे सा. बां. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने हे काम निकृष्ठ दर्ज़ाचे झाले. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, दुचाकीस्वारांना मणक्यांचे आजार ज़डले आहेत.

मिरजगाव परिसरातील महामार्गावरील खड्डयांमध्ये मुरूम टाकल्यामुळे या मुरुमाची आता माती झाल्याने रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत. या धुळीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.

याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करताना दिसत आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासने देण्यात आली. सध्या या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, साईडपट्टया गायब झाल्या आहेत. सध्या रस्त्याची अतिशय दूरवस्था झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24