नेवासा –
शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी अजून वेळ मिळालेला नाही. खासदारांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या नेवासे तालुक्याने लोकसभेला लोखंडे यांना मतांची झोळी भरून दिली, त्याच तालुक्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पीक वाया गेले.
सर्व पक्षांचे खासदार, आमदार आपापल्या मतदारसंघात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतावर जाऊन भेटी देऊन आधार देऊन शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु खासदार लोखंडे यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे की नाही, हे पाहण्याचीही तसदी घेतलेली नाही.
अतिवृष्टीमुळे नेवासे तालुक्यातील १२८ गावांतील ३१८०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ५३ हजार ५०० शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे.
खासदार यांची मतांची झोळी भरल्यानंतर जनतेच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याने मतदारसंघाच्या विकासाचे काय?, असा प्रश्न करत तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.