पारनेर :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी अवमानकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने समर्थकांनी बुधवारी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे केली. २० नोव्हेंंबरपर्यंत कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील एका दैनिकाने रामजन्मभूमीच्या निकालानंतर हजारेंच्या तोंडी काही आक्षेपार्ह विधाने घातली. संबंधित व्यक्तीने यापूर्वीही हजारे यांच्याविषयी अवमानकारक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली.
मात्र, कारवाई न झाल्याने तो वारंवार हजारेंविरोधात अवमानकारक वृत्त प्रसिद्ध करत आहे. अयोध्या वादाचा निकाल घोषित होण्यापूर्वी व घोषित झाल्यानंतर हजारे यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. असे असताना अण्णांवर जातीयवादी असल्याचा ठपका या वृत्तात ठेवण्याचा प्रयत्न झाला. संबंधितावर कारवाई न झाल्यास २१ तारखेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.