पारनेर –
मतदारसंघातील शेतीचे व्यापक प्रश्न, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
मांडवे खुर्द येथे मोठे मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल आमदार लंके यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची मदत घेऊन मतदारसंघातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगून या वेळी बोलताना लंके म्हणाले, मांडओहळ तसेच मुळा नदीच्या पाण्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना मिळाला पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहोत. त्यासाठी योग्य नियोजन करून त्यावरच लक्ष केंद्रित केले जाईल. मी सर्वसामान्य कुटुंबातील असून जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कदापिही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी संजीव भोर म्हणाले, आमदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावून शेती, तसेच पाण्याच्या प्रश्नावर काम करणार आहे. या गटात स्वार्थापायी एकत्र आलेल्या सत्तापिपासू लोकांना आता गाशा गुंडाळावा लागेल, अशी टीका करतानाच यापुढील काळात आमदार लंके यांना सर्वाधिक मताधिक्य देणारा गट म्हणून टाकळी ढाकेश्वर गटाची ओळख असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी प्रशांत गायकवाड, इंद्रजित खेमनर, बापू शिर्के, जालिंदर वाबळे, अमोल उगले, राहुल झावरे, यशवंत जाधव, सुधीर जाधव, जगन्नाथ जाधव, जीजाबाई हारदे, विठ्ठल पुंड, देवराम जाधव आदी उपस्थित होते. जगदीश गागरे यांनी प्रास्ताविक, दत्ता खामकर यांनी सूत्रसंचालन केले. विनायक जाधव यांनी आभार मानले.