पारनेर – सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली व सध्या सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा पर्दाफाश आमदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत केलेल्या पाहणीदरम्यान रविवारी केला.
लंके यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांची तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याच वेळी निकृष्ट कामांविषयी नाराजी व्यक्त करत या कामांची पाहणी करण्याचे जाहीर केले होते.
सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियांता राऊत, उपअभियंता देवकुळे यांच्यासह लंके यांनी विविध कामांना भेट दिली. कामासाठी वापरण्यात आलेले विविध प्रकारचे घटक निकृष्ट असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यात आली नसल्याचे बहुतांश ठिकाणी उघड झाले. कामे निकृष्ट होत असतील, तर कोट्यवधींचा खर्च करून उपयोग काय, असा सवाल लंके यांनी केेला.
सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडत असतील, तर अधिकारी, कर्मचारी केवळ ठेकेदारांचेच हित जोपासतात काय, असा सवालही त्यांनी केला. टक्केवारी बंद करून प्रत्येक काम दर्जेदार झाले पाहिजे.
वाड्यावस्त्यांचे दळणवळण सुलभ व्हावे, यासाठी मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते तयार झाल्यानंतर ते अल्पावधीत खराब झाले, तर त्यासाठी पुन्हा निधी उपलब्ध होत नाही. ठेकेदार स्वतःची तुमडी भरण्यात दंग असतात.
यापुढील काळात कामाचा दर्जा देणाऱ्या ठेकेदारांनीच कामे घ्यावीत. कामांत कोणतीही तडजोड चालणार नाही, असा सज्जड दमच लंके यांनी दिला.