सोने-चांदीचे व्यापारी भरत चिंतामणी गुरुवारी आठवडे बाजार आटोपून सायंकाळी मोटरसायकलने पत्नीसोबत घराकडे निघाले होते. वृद्धेश्वर दूध संघाजवळ पाठीमागून दोन पल्सरवरून आलेल्या ५ जणांनी मोटारसायकल आडवी घालून त्यांना खाली पाडले.
त्यांच्या हातातील सोने-चांदीची पिशवी हिसकावून घेत तेथून पळ काढला. या घटनेने तिसगावकरांमधून मोठा संताप व्यक्त केला जात असून या रस्तालूटमध्ये चिंतामणी यांच्याजवळ सुमारे तीन लाख रुपयाचे सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समजली.
या लूटमारीचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा; अन्यथा पाथर्डी पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा तिसगाव सराफ असोसिएशनच्या वतीने धीरज मैड, राजेंद्र म्हस्के, प्रमोद बेंद्रे यांनी दिला.
पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन वृद्धेश्वर चौक परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.