कर्जत – राष्ट्रवादी हा काय पक्ष आहे असा प्रश्न करीत ही तर केवळ गुंडांची टोळी असून मी तर त्या पक्षाचे नाव अलीबाबा चालीस चोर असे ठेवले असल्याचे प्रतिपादन पणन व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
कर्जत तालुक्यातील राशीन येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राशीन गावासाठी १३ कोटी ३१ लाख रूपयांच्या पाणी योजनेचा शुभारंभ मंत्री श्री. खोत यांच्या हस्ते झाला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे होते.
मंत्री खोत पुढे म्हणाले की, या गुंडाची टोळी असलेल्या राष्ट्रवादीतून अनेक गडी आता पळायला लागले आहेत. सगळे आता लाईनमध्ये असून तुम्हाला एका आठवडाभरात दिसेलच. या पक्षात आता पवार हेच राहतील. गावागावात मंत्री शिंदे यांनी केलेल्या कामाचे फलक लावले आहेत, तेथे विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत.
मंत्री शिंदे यांच्या काळात कामे झाली नसतील असे थोडावेळ मानल तरी तुमच्याकडे पंधरा वर्षे दिल्ली ते गल्ली सत्ता असताना तुम्ही काय कामे केली असा प्रश्न त्यांनी केला. मंत्री शिंदे यांनी जलसंधारणाची मोठी कामे केली असून जर मोठा पाऊस झाला तर तुमच्या भागाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही.
शिंदे यांनी गावागावात निधी दिला आहे. रस्ते, वीज, पाणी आदी मोठी कामे शिंदे यांनी केली आहेत. आमची सत्ता आली तर विकास करू असे विरोधक सांगत आहेत. मात्र त्यांची सत्ता ही येणारच नाही त्यामुळे विकास कसा करणार.
बारामतीच्या नादी लागून भूलून जाऊ नका. सर्वांची शेती तोट्यात असून बारामतीकरांची शेती फक्त नफ्यात आहे. राज्यभरातून धरणातून, रस्त्यातून निधी आणून त्या शेतीत टाकला आहे. मावळ भागात पाणी मागितले तर गोळ्या घातल्या हा इतिहास जनता कधीही विसरणार नसल्याचे ते म्हणाले.