पोलीस स्टेशन जवळच चोरट्यांचा धुमाकूळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर  – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शनिवारी रात्री चोरट्यांनी चक्क पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहत असलेल्या कॉलनी जवळच चोरीचा धुमाकूळ माजवला. या मुळे संगमनेर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आश्वी-प्रतापपूर रस्त्यावर दोन ठिकाणी तर पोलीस स्टेशनपासून थोड्याच अंतरावर असलेले दोन बंद बंगले, अशा एकूण आठ ठिकाणी चोर्‍या करून 1 लाख 37 हजारांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची तक्रार आश्वी पोलीस ठाण्यात सचिन डहाळे यांनी दाखल केली आहे.

स्वरुपचंद गांधी मार्केटमध्ये राहत असलेले सचिन हरिभाऊ डहाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 10 हजार रोख व 1 तोळे सोन्याचे दागिने, विकास रामनाथ वर्पे यांचे 5 हजार रोख व 27 हजारांचे सोने व तिसर्‍या मजल्यावर राहत असलेल्या संदीप श्रीरंग क्षीरसागर यांच्या घरातून 55 हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

चोरट्यांनी आश्वी – प्रतापपूर रस्त्याच्या कडेलाच राहत असलेल्या सुलोचना रमेश पाडंव यांच्या घरातून रोख 30 हजार रुपये व अन्य एका बंद घराचे कुलूप तोडले आहे. तसेच आश्वी बुद्रुक बाजारतळालगत व पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धुडगूस घातला.

याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान रविवारी सकाळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली असून सचिन डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 134/19 प्रमाणे भारतीय दंड संहिता 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24