साकुरी : शिर्डी शहरात दि. १ डिसेंबरपासून ‘ऑपरेशन मुस्कान ७’ ही मोहीम राबविण्यात येत असून, दि. १२ डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर परिसरात अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अपर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलीस पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली.
यात जवळपास दहा ते पंधरा या वयोगटातील १२ बालकामगारांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यात मिळून आलेले बरीचशी मुले ही कालिकानगर उपनगरात राहणारी असल्याचे पुढे आले आहे. या अगोदर झालेल्या कारवाईत देखील याच भागातील मोठ्या प्रमाणावर मुले सापडली होती.
कमी श्रमात हार फुल, लॉकेट, पिशवी विकणारी ही मुले शिक्षण न घेता पैसे कमावतात, असे चौकशीतून पुढे आले आहे. त्यांच्या पालकांना बोलावून योग्य ती समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
पुढील काळात जर ही मुले सापडलीतर त्यांची रवानगी अहमदनगर बालसुधारगृहात केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी के. सी. कांबळे यांनी सांगितले.
या कारवाईत एस. बी. कांबळे, महिला पोलीस एम. के. घुटे, आर. एम. लोहाळे, पी. बी. पडोळे, विकास बागूल यांनी भाग घेतला. ही कारवाई अशीच चालू राहणार आहे. कारवाईची कुणकुण लागताच अनेक मुले मंदिर परिसरातून बेपत्ता झाली.