पिकांच्या नुकसानीच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काढणीस आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भूईमूग यासारख्या पिकास मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होऊन खचून गेले आहेत.
राहाता तालुक्यातील वाकडी येथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव पुंडलिक गाढवे यांचेही या पावसाने अतोनात नुकसान झाले. त्याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांच्यावर अनेक दिवस विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यानच त्यांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने गाढवे यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन भिजली होती. सततच्या पावसाने सोयाबीनला मोड आले. सोयाबीन पिकास मोड आल्याने त्यांना याचा जबर मानसिक धक्का बसला. सतत तीन दिवस ते ‘सोयाबीनला मोड आले, आपले मोठे नुकसान झाले’ असे म्हणत होते.
त्यात त्यांनी जेवण घेणेही बंद केले. त्यामुळे त्यांना शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना श्रीरामपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथे उपचार घेऊनही काहीच फरक न पडल्याने कुटुंबियांनी त्यांना नगरच्या विळद घाटातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तेथे कोमात असताना गाढवे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबियास सुमारे १२ ते १३ लाख रुपये खर्च आला. यासाठी त्यांच्या मुलाने नातेवाईक व मित्रांकडून रक्कम जमा करून वडिलांचा दवाखाना केला. मात्र सर्व प्रयत्न कमी पडले.
गाढवे यांना दीड एकर क्षेत्र आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24