कागदावरच झाडे लावणाऱ्या अधिकाऱ्याचे नगरसेवकाने धरले पाय!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर – शहरात तब्बल १७ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर नगरसेवक गणेश भोसले यांनी यादी मागवली. ही झाडे कागदावरच लावल्याचे स्पष्ट झाले. उद्यान विभागाच्या या कारभारामुळे संतापलेले नगरसेवक गणेश भोसले यांनी या विभागाचे यु. जी. म्हसे यांचे पाय धरून दर्शन घेतले.

या प्रकारामुळे मनपाचे प्रशासन किती निर्ढावले आहे, हे स्पष्ट झाले. मनपा स्थायी समितीची सभा सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. शहरात किती झाडे लावली, असा प्रश्न नगरसेवक भोसले यांनी उपस्थित केला. त्यावर म्हसे यांनी १७ हजार झाडे लावल्याची माहिती दिली.
शहरात एवढी झाडे लावलीच नाहीत, असे सांगून यादी सादर करा असे भोसले यांनी सांगितले. त्यावर म्हसे यांनी विद्यार्थ्यांना वाटलेल्या झाडांची माहिती दिली. वाटप केलेली झाडेच लावल्याचे म्हसे यांनी ठासून सांगितल्यानंतर मनपाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करून भर सभेत भोसले म्हसे यांच्या पाया पडले.
उत्पन्नवाढीसाठी महालक्ष्मी व सिद्धिबाग उद्यान खासगीकरणातून चालवण्यासाठी देण्याचा विषय सभेत होता. याला फारसा आक्षेप न घेत दोन्ही उद्यानांच्या बीओटीला समितीने हिरवा कंदील दाखवला.
परंतु याच प्रस्तावात प्रशासनाने मातोश्री उद्यान (विनायकनगर), शाहूनगर उद्यान, कपिलेश्वर उद्यान, विद्या काॅलनी उद्यान, मातोश्री (भुतकरवाडी) शिवतीर्थ उद्यान, नाना-नानी पार्क, सन्मित्र कॉलनीतील उद्याने ना नफा ना तोटा तत्वावर चालवण्यास देण्याचा विषय होता. सुभाष लोंढे म्हणाले, उद्यानांचा विषय स्थगित ठेवा.
कारण आपण सध्या असलेल्या ठेकेदारांनाच ८० हजार रुपये देतो. फिरोदिया यांना उद्याने द्यावीत, ते विकास करतील, असेही त्यांनी सूचवले.
अहमदनगर लाईव्ह 24