न्यूयॉर्क : हवामान बदलाच्या विरोधात लढा देणाऱ्या स्वीडनच्या १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गला अमेरिकेच्या ‘टाइम’ मासिकाने यंदाची ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित केले आहे. हा बहुमान मिळवणारी ग्रेटा ही सर्वात तरुण व्यक्ती बनली आहे.
जगप्रसिद्घ ‘टाइम’कडून १९२७ पासून ‘पर्सन ऑफ द इअर’ निवडण्यात येतो. शालेय विद्यार्थिनी असलेल्या ग्रेटाने हवामान बदलाविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी स्वीडनच्या संसदेबाहेर हवामान बदलाविरोधात एकट्याने आंदोलन केल्यानंतर ती चर्चेत आली होती.
यानंतर जगभरातून तिला शालेय विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे समर्थन मिळाले होते. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलताना देखील तिने या मुद्यावर जागतिक नेत्यांना कठोर शब्दांत खडसावले होते. तिच्या या कामाची दखल घेत ‘टाइम’ने तिला ‘पर्सन ऑफ द इअर’ घोषित केले आहे.
घोषणेच्या वेळी ग्रेटा ही माद्रिदमध्ये संयुक्त राष्ट्र अर्थात यूएनने आयोजित केलेल्या हवामान बदलाच्या परिषदेत जागतिक प्रतिनिधीसमोर भाषण करत होती. ‘टाइम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ग्रेटाने हवामान बदलाच्या संकटाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्यात ग्रेटा यशस्वी ठरली. अस्पष्ट विचारांना स्पष्ट करत तातडीने बदल करण्याचे आवाहन करत तिने जागतिक आंदोलन उभारल्याचे ‘टाइम’ने म्हटले आहे.
याशिवाय ‘टाइम’ने अमेरिकन महिला फुटबॉल टीमला ‘अथलीट ऑफ द इअर’, अमेरिकन लोकसेवकांना ‘गार्जियन ऑफ द इअर’, गायक लिजो याला ‘इंटरटेनर ऑफ द इअर’ आणि डिज्नीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांना ‘बिझनेस पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे चालू वर्षाच्या सुरुवातीला ग्रेटाची शांततेच्या ‘नोबेल’साठी शिफारस करण्यात आली होती. ग्रेटाच्या आंदोलनाला जगभरातील लहान-थोरांनी आपला पाठिंबा दर्शविला होता. हवामान बदलाविरोधातील जागतिक चेहरा म्हणून ग्रेटाकडे पाहिले जात आहे.