लखनौ : भाजपने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दाखविलेला सत्याचा मार्ग पहिल्यांदा अनुसरावा, त्यानंतरच बापूंविषयी बोलावे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी केली आहे.
गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे काँग्रेसने काढलेल्या ‘गांधी संदेश पदयात्रे’त प्रियंका गांधी यांनी सहभाग घेतला. शहीद स्मारकापासून काढलेल्या अडीच किमीच्या यात्रेत त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गांधीजींनी दाखविलेल्या सत्याच्या मार्गावर भाजपने चालण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतरच त्यांनी बापूंबद्दल बोलावे, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. . दरम्यान, गांधी संदेश पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेदरम्यान गांधीजींच्या घोषणांनी परिसर निनादला होता. या निमित्ताने काँग्रेसने राज्यात शक्तिप्रदर्शन केले आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने छुप्या मार्गाने आडकाठी केली.
त्यामुळे प्रियंका गांधी यांना पदयात्रेत कमी वेळ देता आला. दोन वाजण्याच्या आत पदयात्रेतून बाहेर पडण्याचे जिल्हा प्रशासनाने प्रियंकांना बजावले होते. त्यामुळे पक्षाच्या मुख्यालयातसुद्धा त्या येऊ शकलेल्या नाहीत, असे सांगत त्यांनी भाजपच्या दडपशाहीवर हल्ला चढविला.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद, वरिष्ठ नेते अखिलेश प्रताप सिंह यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पदयात्रेत सहभाग नोंदविला.