दिल्ली : आरोग्यास हानिकारक आहे की नाही याबाबत वाद असलेल्या ई-सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार देशात ई-सिगारेटचे उत्पादन व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवरी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच धूम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे वेड वाढल्याचे त्यांनी सांगितले.
ई-सिगारेटपेक्षा सिगारेट अधिक घातक असून, त्यावर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.
त्यावर ई-सिगारेटचे अद्याप व्यसन लागले नसून, त्यावर सरकारने आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. तसेच ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्यादा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.