बर्ड फ्ल्यूला घाबरण्याचे कारण नाही अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्ण सुरक्षित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला असला तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत ते पूर्णता सुरक्षित असल्याचा कृतिशील संदेश जिल्हावासियांना दिला. राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्ल्यू आढळून आल्यानंतर पोल्ट्री व्यवसाय संकटात आल्याचे चित्र होते.

बर्ड फ्ल्यू च्या प्रादुर्भावामुळे नागरिका चिकन खाण्याविषयी कचरत होते. त्यांच्या मनात असणाऱ्या भीतीमुळे या व्यवसायावरही परिणाम होऊन शेतीला पूरक व्यवसाय असणाऱ्या पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला होता. मात्र, अशा अफवा आणि गैरसमज दूर कऱण्यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेल्या पुढाकाराला डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी.एन शेळके, पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. देविदास शेळके, डॉ. उमाकांत शिंदे, शिवाजी शिंदे, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, संतोष कानडे, दीपक गोलक, दत्तात्रय सोनटक्के, कानिफ कोल्हे, डॉ. कुकडे, अनिल झारेकर, विठ्ठल जाधव, गोरख शेळके आदी यावेळी उपस्थित होते.

केवळ गैरसमज आणि अफवा यामुळे हा व्यवसाय अडचणीत येऊ नये, शेतीपूरक व्यवसायात पशूधनानंतर कुक्कुटपालनात जिल्हा आघाडीवर आहे, त्याची घडी बिघडू नये, यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेला पुढाकार आणि त्याला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद ठरला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24