अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : बांधावर खतं पोहचविण्याची सरकारची घोषणा पोकळ ठरली असून दुकानातच नाही तर, बांधावर खतं मिळणार कधी? असा सवाल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
बीयाणांमध्ये शेतक-यांची फसवणूक करणा-या खासगी कंपन्यांनाही नूकसान भरपाई देण्याचा आदेश सरकारने द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
शेतक-यांसमोर ऐन खरीप हंगामात खतं आणि बीयाणांच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना आ.विखे पाटील यांनी म्हणाले की,
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतक-यांची बीयाणांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, बाजरी आणि इतरही पिकांची उगवण क्षमता नसलेले बीयाणे विक्री केले गेले.
शासनाचा अंगीकृत विभाग असलेल्या महाबीजकडूनही शेतक-यांची फसवणूक व्हावी हे अतिशय दुर्दैवी असून, सोयाबीनच्या उगवण क्षमतेचे निकषही यंदा बदलल्याने,
हाती येईल तसे बीयाणे राज्यात विकले गेल्याने, शेतक-यांचा खर्चही दुप्पट झाला. खासगी कंपन्याकडूनही झालेली फसवणूक पाहाता कृषि विभागाचा हलगर्जीपणाच यामुळे चव्हाट्यावर आला असल्याची टिका त्यांनी केली.
खतांच्या बाबतीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधावर खतं देण्याच्या शासनाच्या योजनेचा राज्यात पुर्णत: फज्जा उडाला असून, कृषि सहाय्यकही बांधावर पोहचू शकले नाही.
खतांचे लिंकींग मोठ्या प्रमाणात सुरु असून खरेदीच्या पावत्याही दिल्या जात नाहीत, कोणत्याही दुकानदाराने उपलब्ध असलेला स्टॉक आणि किमतींचे फलक लावलेले पाहायला मिळत नाही.
याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील यांनी सांगितले की, कृषी विभागातील आधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा कोणताही समन्वय नसल्याचा मोठा फटका शेतक-यांना सहन करावा लागला आहे.
खतासाठी होत असलेली अडवणूक आणि बियाणांमध्ये झालेल्या फसवणूकीनंतर शेतक-यांनी कृषि विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी आधिका-यांनी जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष केले.
कंपन्या आणि दुकानदारांना पाठीशी घालण्याचे काम आधिका-यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतक-यांसमोर एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली
असतानाही आघाडी सरकारमधील कोणताही मंत्री याबाबत बांधावर जावून पाठपुरावा करताना दिसत नाहीत, सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडून दिले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बीयाणे कंपन्यांकडून शेतक-यांची झालेली फसवणूक लक्षात घेता दुबार पेरणीसाठी शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करावी,
खतांचे लिकींग आणि जादा दराने विक्री करणा-या दुकानदारांवर कारवाई करावी आणि महाबीज प्रमाणेच खासगी कंपन्यांकडूनही शेतक-यांना नूकसान भरपाई देण्यासाठी सरकारने आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews