अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात पुन्हा लॉकडाउन करावे किंवा नाही याबाबत जिल्ह्यातील आमदारांसमवेतच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. आता लॉकडाऊन करण्याचा विषय संपलेला आहे.
सर्वांना आता कोरोना सोबत घेऊन जगायचे आहे व काळजी घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सूचना व नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.
नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार व संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आता जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत व त्यामुळेही रुग्ण संख्या वाढणार आहे. पण जिल्ह्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन होणार नाही, असेही स्पष्ट करून ते म्हणाले, करोना बधिताचे मृतदेह एकावर एक रचून नेण्याचा प्रकार दुर्दैवी आहे व यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.
कमी लक्षण असणाऱ्या रुग्णांचे घरीच विलगीकरण करावे, अशा सूचना दिल्या असल्या तरी जिल्ह्यामध्ये प्रशासनाने मात्र तसे केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण, एखाद्याला उपचार द्यायचे असल्यास त्याला घरी उपचार घेता येईल. मात्र, ते घरी देखील व्यवस्थित उपचार घेतील
का, जर ते सर्वत्र फिरत बसले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न आहे. शिवाय, आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये. त्यामुळे सध्या प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved