अहमदनगर :- अपत्यप्राप्तीबाबत सम-विषम तारखांच्या स्त्री संबंधाचा सल्ला किर्तनात देणारे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना गुरूवारी ‘पीसीपीएनडीटी’ने नोटीस दिली आहे.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर तात्काळ खुलासा करण्याचे त्यात म्हटले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
मराठी कीर्तन व्हिडिओ या युट्यूबच्या चॅनेलवर 4 फेब्रुवारी रोजी अपलोड झालेल्या क्लीपमध्ये इंदोरीकर महाराजांनी सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्तव्य केले होते.
या बाबत युट्यूबच्या चॅनेलवर अपलोड झालेल्या क्लीपवरून वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओबाबत आपले मत काय आहे, याबाबत ‘पीसीपीएनडीटी’ला आपला खुलासा तात्काळ करावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. आता याबाबत महाराज काय खुलासा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.