अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी केलेल्या जबर मारहाणीत शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय ४२ वर्षे) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यात आणुन ठेवण्यात आला होता. यामुळे काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय ४२) हा शुक्रवारी बोधेगाव येथे डिझेल आणण्यासाठी मोटारसायकलवर गेला होता.
बोधेगाव येथून डिझेल घेऊन येताना शिंदळीच्या ओढ्यात हरिभाऊ बडधे याला किशोर उद्धव दहफिळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. वरील पाच जणांनी मारहाण केल्यानंतर हरिभाऊ हा घरी आला असता लहान भाऊ नारायण पांडुरंग बडधे याला सर्व हकीगत सांगितली.
यावेळी नारायण याने काही घाबरू नको, काय असेल ते आपण सकाळी पाहु, असे म्हणुन तो आपल्या कामावर निघून गेला. शनिवारी सकाळी नारायण बडधे हा हरिभाऊ बडधे याला झोपेतून उठवण्यासाठी गेला असता तो मयत झाल्याचे लक्षात आले. त्याला शेवगाव उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले.
त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रुग्णालयातून मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणारे किशोर उद्धव दहफिळे, दिलीप महादेव दहिफळे,
सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव) यांच्यावर नारायण पांडुरंग बडधे यांच्या फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.