कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : शेवगाव बाजार समितीत कांद्याला अत्यंत नीच्चांकी भाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना आवरण्यासाठी बाजार समितीने पोलिस संरक्षण मागवले.

मात्र, पोलिस बळाचा वापर करत समितीने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मळेगावचे माजी सरपंच शिवाजीराव भिसे यांनी केला.

बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर प्रतिकिलो २ ते ३७ रुपये, असा दर व्यापाऱ्यांनी काढल्याने शेतकरी संतप्त झाले.

घोडेगाव, वांबोरी, गुलटेकडी, या ठिकाणी आज कांद्याचे प्रतिकिलो २० ते ९५ रुपये दर असताना शेवगावमध्ये एवढा नीच्चांकी दर का? असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल होता त्यामुळे कांदा विक्रीसाठी तेथे आलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत लिलाव बंद पाडळे व बाजार समितीच्या कार्यालयासमोर पाथर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

आंदोलन सुरू झाल्यानंतर समितीचे सभापती व सचिवांचा भ्रमणध्वनी क्रमांक आम्हाला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बाजार समितीचे मापाडी व कर्मचाऱ्यांकडे केली ;परंतू कुणीही त्यांना भ्रमणध्वनी क्रमांक दिले नाहीत.

एवढेच नव्हे, तर समितीचे सभापती अनिल मडके यांनी आंदोलनस्थळी न जाता माझ्या कार्यालयात येऊन चर्चा करा, असे म्हणाल्याने शेतकरी आणखी संतप्त झाले. अखेर पोलिसांना तेथे पाचारण करण्यात आले.

समितीचे माजी सभापती संजय कोळगे यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यात मध्यस्थी करून पुन्हा लिलाव सुरू केले. मात्र, तरीही कांद्याला समाधानकारक भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, बाजार समिती व कांदा व्यापारी यांच्यात मिलीभगत असून, इतर बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी योग्य दर मिळेल, अशा ठिकाणी कांदा विक्रीसाठी न्यावा, असे आवाहन शिवाजीराव भिसे व ज्येष्ठ कार्यकर्ते वाय. डी. कोल्हे यांनी केले आहे.

Entertainment News Updates

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24