अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कालपासून संगणकीय प्रणालीद्वारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
नगर तहसील कार्यालय आवारात तहसीलदार उमेश पाटील यांनी यासाठी यथास्थित नियोजन केले असून इच्छूक उमेद्वारांच्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित केला आहे.
उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी फक्त देहरे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी तीन नामांकन अर्ज प्राप्त झाले. उर्वरित ठिकांणी नामांकनाचे खाते निरंक राहिले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या पूर्वतयारीसाठी इच्छूकांची धावपळ सुरु आहे. उद्यापासून सलग तीन दिवस सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडे आज गुरुवारसह येत्या सोमवार ते बुधवार असे फक्त चार दिवस हाती उरले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत.