अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांचे विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विखे पाटील भाजपत प्रवेश करणार हे नक्की झाले आहे. त्यातच शनिवारी लोणी येथे विखे समर्थक १३ आमदारांची गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करताच राधाकृष्ण विखे पाटलांचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
यापूर्वी विखे पाटलांनी राज्याचे कृषी खाते यशस्वीरित्या सांभाळले असून, तेच खाते त्यांना पुन्हा देण्यात येणार आहे. यासह गृहनिर्माण खातेही विखेंना देण्याचे घाटत आहे.जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समोर येत आहे.
काँग्रेसचे स्टारप्रचारक आणि विरोधीपक्षनेते असतानाही विखे पाटील हे पक्षाच्या प्रचारापासून दूरच राहिले. विखे पाटलांचे सुपुत्र, नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय यांच्या प्रचारात पूर्णत: व्यस्त होते.
त्यामुळे नगरमध्ये काँग्रेसचे स्टार प्रचारक हे भाजपचे काम करताना दिसून आले. परिणामी, राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती.
मात्र, विखे यांनी जाहीररित्या तशी कोणतीही कबुली दिली नाही. मात्र, आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी वारंवार जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा आता निकाल लागला असून, सर्वत्र भाजपचे ‘कमळ’ फुलले आहे. त्यामुळे विखे पाटील हेही भाजपची वाट धरणार, यात तीळमात्र शंका उरलेली नाही.
विखे यांनी आता राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांना साद घातली आहे. त्यातील बारा आमदार विखे पाटलांच्या गळाला लागल्याचे पुढे येत आहे. आणखी काही दिवसांत यामध्ये वाढ होईल, असे सूत्रांनी सांगितले.
सध्या पडलेल्या भयावळ दुष्काळात विखे पाटलांना कृषिखाते देऊन शेतक -यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. विखे पाटलांना सुमारे दोन – तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी विखे पाटलांना गृहखाते मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार संपूर्ण देशभरात मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असून, त्यात बदल करण्याची वरिष्ठ नेत्यांची बिल्कुल इच्छा नसल्याचे समोर येत आहे.
पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर राज्याच्या कृषिखात्याचा अतिरिक्त कारभार हा सध्या चंद्रकांत पाटलांकडे आहे. मंत्री पाटील यांचा भार कमी करून विखे पाटलांना देण्यात येणार आहे.त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले गृहनिर्माण खातेही विखे पाटलांकडे देण्यात येणार असल्याचे पुढे येत आहे.
येत्या रविवारी होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात विखे पाटलांसह भाजप प्रवेश करणाच्या दोघांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत भाजपच्या नेत्यांनी दुजोरा दिला नाही.
दरम्यान विखे पाटलांसोबत अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी किती आमदार भाजपात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसची चिंता वाढली आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह इतर काँग्रेस आमदार पक्ष सोडून भाजपत गेले तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे. आमदारांची अशीच गळती सुरू राहिली तर लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक देखील काँग्रेस पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे.