अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा सात फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून या निमित्तानं १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर शहरामध्ये
‘काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
ना. बाळासाहेब थोरात हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या सुसंस्कृत आणि संयमी व्यक्तिमत्वासाठी ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.
राज्याच्या काँग्रेसचे ते नेतृत्व करतात. त्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिमान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच नगर शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये पक्ष बळकटीकरण सप्ताहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ फेब्रु.- अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग बांधवांसाठी मिष्टान्न भोजन वाटप कार्यक्रम, २ फेब्रु.- मुशायरा (कवि संमेलन), ३ फेब्रु. – गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी वाटप उपक्रम, ४ फेब्रु. – शिवकालीन मर्दानी खेळांचे लाईव्ह प्रात्यक्षिक, त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू, क्रिडा प्रशिक्षक यांचा सन्मान सोहळा, ५ फेब्रु.- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची प्रकट मुलाखत, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक किशोर रक्ताटे यांचे व्याख्यान पार पडणार आहे.
६ फेब्रु. – महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर कार्यक्रम, ७ फेब्रु. – ‘शिक्षण कट्टा’ उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवशी ७ फेब्रुवारीला सायंकाळी पक्ष कार्यालयमध्ये शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी आयोजित विशेष संमेलनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे.