पाथर्डी : मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन मढीकडे येणाऱ्या भाविकांची होंडा कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आजी व नात ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.
मायंबा घाटात कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली. तेजल सचिन वाघ (२ वर्षे) या मुलीला जखमी अवस्थेत नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. खरवंडी कासार येथील रहिवासी सचिन लक्ष्मण वाघ (वय ३२) आपल्या कुटुंबासमवेत मुलीच्या वाढदिवसानिमित्त मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेण्यासाठी मायंबा येथे आले होते.
दर्शन घेऊन मढीकडे येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वळणावरून होंडा अॅमेझ कार (एमएच-१६ बी वाय-९७ ६७) तीनशे फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बकुळा लक्ष्मण वाघ (वय ५२, खरवंडी कासार) जागीच ठार झाल्या, तर तेजल सचिन वाघ (वय २) या मुलीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
सचिन लक्ष्मण वाघ (वय ३२), माधुरी सचिन वाघ (वय २७) हे दोघे जखमी झाले. कार दरीत कोसळताच घाटातून प्रवास करणाऱ्या तिसगाव येथील युवकांनी व गुराख्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
मढी, सावरगाव येथील ग्रामस्थ व भाविकांनी मदत करत जखमींना दरीतून बाहेर काढले. जखमींना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.