अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला उड्डाण पुलाचे काम अखेरीस सुरु झाले असून अत्यंत वेगाने उड्डाण पुलाचे काम सुरु आहे.
दरम्यान उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतुकीच्या मार्गामध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरामध्ये सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरु असून
या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूकीत आजपासून (दिनांक २८ जानेवारी) ते दिनांक ११फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत बदल करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कळविले आहे.
यानुसार, उपरोक्त कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय रोडने शासकीय पोस्ट ऑफीस पासून जीपीओ चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीपीओ चौकाकडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक शासकीय पोस्ट ऑफीस येथून अशोका हॉटेलमार्गे अहमदनगर-पुणे रोड या मार्गे वळविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीपीओ चौकामार्गे पुणेकडे जाणारी वाहतूक पराग बिल्डींग चांदणी चौकामार्गे अहमदनगर-पुणे रोड या मार्गे वळविण्यात आली आहे.नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.