राहाता :- निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम अवैधरित्या बंद केल्याप्रकरणी अकोल्याचे आमदार वैभव पिचड व काही शेतकऱ्यांविरुद्ध निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार केली.
राष्ट्रवादीचे आमदार पिचड यांनी बनावट शेतकऱ्यांना पुढे करून किमी दोनमधील कालव्याचे काम बेकायदा बंद केल्याने कृती समितीने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
मात्र, जलसंपदाने टोलवाटोलवी केली. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना निळवंडे कालवा कृती समितीचे शिष्टमंडळ भेटले, पण उपयोग झाला नाही.
अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कालव्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या आमदार पिचड व बनावट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असे आवाहन कालवा कृती समितीच्या वतीने नानासाहेब जवरे यांनी केले.
अकोले तालुक्यात शंभर टक्के भूसंपादन झाल्याचे व त्याचा मोबदला मिळाल्याचे अकरा पानांचे पुरावे त्यांनी तक्रारीसोबत जोडले आहेत.