अहमदनगर :- अधिकाऱ्याला बूट फेकून मारल्याचा प्रकार व्हीडिओवर मी पाहिला. अधिकारी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे.
यांच्याबरोबर जे लोक राहिले त्यांच्यावर केसेस दाखल होऊन उद्वस्थ झाले आहेत, अशी टीका आ. संग्राम जगताप यांनी गुरूवारी अनिल राठोड यांच्यावर केली.
जगताप म्हणाले, अधिकाऱ्याला बूट फेकून मारलेला सर्वांनी पाहिला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पण हे नेते दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगतात मी गुन्हा दाखल करायला सांगितला.
तथापि, यांनी जर बूट फेकला नसता, तर गुन्हा दाखल करायला कोणी गेलेच नसते. मी चित्रफीत पाहिली. त्यावरून हा पक्ष कसा आहे हे स्पष्ट होते.
२०१८ मध्ये पोलिस प्रशासनाने अहवाल पाठवला होता. त्यात हे कोणत्या स्तराला जातील हे पोलिसांनी अहवालावरून स्पष्ट केले.
हे खोटे गुन्हे दाखल करण्याचे मार्गदर्शन करतात. असे चुकीचे करून कोणावरही अन्याय करू नये. खोट्या गुन्ह्याचा मीदेखील बळी ठरलो आहे.
यांच्याबरोबर जे लोक राहिले, त्यांच्यावर केसेस झाल्या आहेत. या प्रकरणात आमच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव गोवले आहे. ते नऊवेळा निवडून आले असून त्यांचे नाव वगळावे, असे जगताप म्हणाले.