अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) मुद्द्यावरून उत्तर प्रदेशात दंगल भडकविण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी इतर राज्यांमधून गुंड आणत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी मंगळवारी केला आहे.
केंद्र सरकारने ‘सीएए’ला मूर्त स्वरूप दिल्यानंतर त्या विरोधात उत्तर प्रदेशात मोठा असंतोष उफाळून आला. बिजनौर, लखनौ, अलाहाबाद, मेरठ आणि अलिगडसह अनेक जिल्ह्यांत दगडफेक व जाळपोळ घडली.
यादरम्यान, प्रियंका गांधी यांनी सक्रियता दाखविली. त्यांनी परराज्यातून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाचारण केले. राज्यात अनागोंदी माजविण्याचा प्रयत्न करीत त्यांनी येथील शांतता भंग केली, असा आरोप स्वतंत्रदेव सिंह यांनी केला.
बरेली जिल्ह्यातील एका महाविद्यालयात सीएए प्रबोधनासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रियंका गांधी व अखिलेश यादव यांच्यावर त्यांनी तोफ डागली.
राजस्थान व मध्य प्रदेशात जाणे टाळत प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात दंगल घडवित हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत. या करिता इतर राज्यांमधून गुंडांना त्या बोलवित आहेत. दगडफेक व जाळपोळ घडवित त्या राज्यातील शांतता धोक्यात आणत असल्याचा गंभीर आरोप सिंह यांनी केला.