महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :-  पशुवैद्यक डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीने ‘दिशा’ विधेयक मंजूर केले आहे. यात अशा प्रकरणांमध्ये २१ दिवसांच्या आत निकाल देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आता आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत राज्य सरकार जानेवारी महिन्यात प्रस्ताव आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महिलांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींचा तपास करून १०० दिवसांच्या आत त्यांना फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून सादर केला जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

अत्याचारांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. या प्रस्तावाचा आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याची भूमिका असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही अशा प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24