संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

असा प्रकल्प राबवलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्युत विभागाला दिले आहेत.

शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी सायंकाळी विद्युत विभागाची बैठक घेतली.

या बैठकीत नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनील त्र्यंबके, रवींद्र बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, संजय ढोणे, सूरज शेळके, सतीश शिंदे, विद्युत विभागप्रमुख कल्याण बल्लाळ यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी झालेल्या चर्चेत विद्युत विभागाच्या सध्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत महापौर वाकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्युत विभागाचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत.

नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, यापुढील काळात हे खपून घेतले जाणार नाही. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

शहरातील पथदिव्यांच्या वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. हे दिवे लावल्यानंतर किती वीजबचत होईल, तसेच एलईडी दिव्यांसाठी महापालिकेला किती खर्च येईल, कोणत्या रस्त्यावर किती वॅटचे दिवे लावावे लागतील,

कॉलनीत किती वॅटचे दिवे लागतील याचा अभ्यास करून, तसेच अशा प्रकारचा प्रकल्प राबवलेल्या इतर महापालिकांमधून याबाबत माहिती घेऊन परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे आदेशही या वेळी महापौर वाकळे यांनी दिले.

महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुखपदी अभियंता कल्याण बल्लाळ यांची नियुक्ती केलेली आहे. या बैठकीत अभियंता बल्लाळ यांनी आपण सिव्हिल इंजिनइर असून विद्युत विभागाचा कुठलाही अनुभव आपणाला नाही. त्यामुळे माहिती नसलेल्या कोणत्याही प्रस्तावावर आपण सही करणार नाही.

मला जेलमध्ये जायचे नाही. त्यामुळे विद्युत विभागाच्या प्रमुखपदी त्या विभागाची माहिती असलेला विद्युत अभियंता नेमावा, अशी मागणी अभियंता बल्लाळ यांनी या वेळी केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24