अहमदनगर :- फक्त सहा दिवसांत ‘कोविड १९‘ साठी नवीन हाॅस्पिटल उघडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता वैद्यकीय अभिमत विद्यापीठात जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब तयार केली आहे.
राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर चाचण्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र विखे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
सध्या कोरोना चाचणीसाठी पुण्याला जावे लागते. या प्रक्रियेत वेळ अधिक लागतो. हे टाळण्यासाठी कोरोना चाचणीचे तंत्रज्ञान संस्थेत उभारण्यात आले. या टेस्ट लॅबच्या प्रशिक्षणास डाॅ. विखे यांच्या हस्ते सुरुवात झाली.
याप्रसंगी मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डाॅ. शरियार रोशनी, डाॅ. रवींद्र कारले व माॅलबायो कंपनीचे प्रतिनिधी विवेक अलाट व राजन गावडे आदी उपस्थित होते.
या लॅबमध्ये एकाच वेळी चार टेस्ट घेणे शक्य होणार आहे. रोज २४ तासांत १२० टेस्ट करता येतील. कोरोना विरूध्दच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत,
पण इथंपर्यंत यायची वेळ तुमच्यावर येऊ नये, घरीचं रहा…सुरक्षित रहा, असे डाॅ. विखे यांनी सांगितले. अशा प्रकारची लॅब उभारणारे प्रवरा ग्रामीण रुग्णालय हे देशातील पहिले रुग्णालय असल्याची माहिती डाॅ. रोशनी यांनी यावेळी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®