फक्त चारच दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात झाला इतका पाऊस !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात १४ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यात कुठेच पाऊस झाला नव्हता.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले.

दरम्यान, नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद पारनेर तालुक्यात झाली. अकोले व कर्जत तालुक्यात प्रत्येकी ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहर व जिल्ह्यात ३१ मेच्या मध्यरात्रीपासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली होती. १ व २ जूनला ही जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला होता.

३ जूनला थंड वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्यरात्री देखील अनेक भागात पाऊस झाला. गुरुवारी मात्र सर्वच भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता.गेल्या चोवीस तासांत सर्व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.

अकोले तालुक्यात ९१, संगमनेर तालुक्यात ५५, कोपरगाव तालुक्यात ४९, श्रीरामपूर तालुक्यात ४०, राहुरी तालुक्यात ७८, नेवासे तालुक्यात ६९, राहाता तालुक्यात ४२, नगर तालुक्यात ६५,

शेवगाव तालुक्यात ६४, पाथर्डी तालुक्यात ३९, पारनेर तालुक्यात १११, कर्जत तालुक्यात ९१, श्रीगोंदे तालुक्यात ५७ व जामखेड तालुक्यात २७ मिलिमीटर पाऊस गेल्या २४ तासांत झाला.

नगर जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पारनेर, अकोले व कर्जत तालुक्यात झाली. गेल्या चार दिवसांत जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतींना ग्रामीण भागात वेग आला.

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी १ ते ४ जून पर्यंत पावसाची काहीच नोंद झाली नव्हती, यंदा मात्र गेल्या चार दिवसांत १४ टक्के पाऊस झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24