अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने 7 व 8 जानेवारीला रॅली काढण्यात येणार आहे.
7 ला सकाळी 11 वाजता नगर येथून आमदार डॉ. सुधीर तांबे रॅलीला प्रारंभ करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे यांनी दिली.
दुपारी एक वाजता राहुरी, तीन वाजता कोल्हार, साडेचार वाजता लोणी, तर सायंकाळी पाच वाजता निमगावजाळी येथे रॅलीचे आगमन होईल.
संध्याकाळी संगमनेर येथे रॅली पोहोचेल. दुसऱ्या दिवशी संगमनेर येथील यशोधन मैदानावर रॅलीचा समारोप होईल. मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डाॅ. तांबे, राष्ट्रीय सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
रॅलीत ट्रॅक्टर, दोन चारचाकी वाहन व 20 ते 25 मोटरसायकली सहभागी होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष व कार्यकर्ते रॅलीचे स्वागत करणार आहेत, असे झावरे यांनी सांगितले.