अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : वैद्यकिय व्यवसाय फक्त पैश्यासाठी मर्यादित न ठेवता, सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे. प्रामाणिकपणे येथे रुग्णसेवा केली जात आहे. बरे झालेले रुग्ण हेच जाहिरातीचे ब्रँड अँबेसिडर ठरतात. डोळे व ह्रद्य बाबतीत रुग्णांनी जागृक राहिले पाहिजे. डोळ्यांच्या दृष्टीअभावी जगाचे सौंदर्य हरपते तर ह्रद्या अभावी जग सोडून जाण्याची वेळ येत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षण तज्ञ प्रा. श्रीकांत बेडेकर यांनी केले.
लालटाकी, कालिका प्राईड येथील रसाळ नेत्रालयच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा व मोफत नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. बेडकर बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित मनगाव प्रकल्पाचे डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, नेत्रालयाचे संचालक डॉ. प्रकाश बळवंत रसाळ, अमृता रसाळ, मंगलाताई रसाळ, प्रा.मंगेश रसाळ, योगेश रसाळ, मनिषा रसाळ, रोहिणी रसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश रसाळ यांनी सर्वसामान्य रुग्ण हा केंद्रबिंदू मानून सेवा देण्याचे कार्य चालू आहे. वैद्यकिय क्षेत्र पैश्यासाठी नव्हे तर माणुसकीने ऋणानुबंध निर्माण करण्याचे कार्य आहे. हे समाधान पैश्यात न मोजता येणारे आहे. अद्यावत सुविधा व रुग्णांप्रती असलेली नम्रतेने रुग्णांना चांगला अनुभव येत असल्याने संपुर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर मनगाव प्रकल्पाला रसाळ नेत्रालय सर्व प्रकारची निशुल्क सेवा देणार असल्याचे त्यांनी जाहिर करुन, भविष्यात रेटीना मशीन, ऑप्टिकल बायोमीटर आदी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन आय बँकसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रसाळ परिवाराच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रुग्णांना रोप व भेटवस्तू देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
छायाताई फिरोदिया यांनी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त अद्यावत तंत्रज्ञानासह रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे. अल्पावधित हे नेत्रालय सर्वांच्या पसंतीस उतरले असून, दृष्टीदोष असलेल्या सर्वांसाठी हे नेत्रालय नवसंजीवनी ठरत असल्याचे सांगितले. राजेंद्र धामणे म्हणाले की, अंधारलेल्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य रसाळ नेत्रालय करीत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत मनगावच्या प्रकल्याच्या पाठिशी ते उभे राहिले आहे. वैद्यकिय क्षेत्रातील काही चुकीच्या गोष्टीमुळे नागरिक या व्यवसायाला वेगळ्या नजरेणे पाहत आहे. मात्र या क्षेत्रात देखील चांगले सामाजिक कार्य करणारे व्यक्तीमत्व असून, सामाजिक बांधिलकीने कार्य करीत आहे. वंचित, दुर्बल घटकांसाठी देखील रसाळ नेत्रालय झटत आहे. अशा व्यक्तींना देखील समाजाने बळ देण्याचे कार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.
या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी मोफत करण्यात आली. तर शिबीरार्थी रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
रसाळ नेत्रालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, फेको इमल्सिफिकेशन मशीन (मोतीबिंदूच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त), शस्त्रक्रियेसाठी लागणार्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अत्याधुनिक बी क्लास ऑटोक्लेव्ह मशीन, चष्मा नंबर अचूक मिळण्यासाठी ऑटो रिफ्रॅक्टो किरॅटोमीटर मशीन, डोळ्याचे दाब व काळ्या बाहुलीची जाडी मोजण्यासाठी नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर व पॅकीमेट्री मशीन, शस्त्रक्रियेनंतर डोळ्यात लावण्याच्या लेन्सची पॉवर अचूक काढण्यासाठी अत्याधुनिक ए स्कॅन मशीन उपलब्ध आहेत. रसाळ नेत्रालयामध्ये मोतीबिंदू विभाग, काचबिंदू, कॉर्निया, ऑक्युलोप्लास्टी विभाग, रेटीना तपासणी व उपचार, डोळ्यांचे अपघात- उपचार आणि शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्सेस, लहान मुलांचे नेत्रोपचार, कॉम्प्युटरराईज्ड नेत्र तपासणी विभाग कार्यरत असल्याची माहिती कार्यकारी संचालिका अमृता रसाळ यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com