उपासमारी थांबून हाताला काम मिळण्यासाठी विडी कामगारांचे 4 जूनला रास्तारोको

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : हातावर पोट असलेल्या व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या विडी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) च्या वतीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

विडी कामगारांच्या हाताला काम मिळून, विडी विक्रीला परवानगी मिळावी तसेच विडी कामगारांना शासनाकडून 10 हजार रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी दि.4 जून रोजी पत्रकार चौकात रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली व शंकरराव मंगलारप यांनी दिली.

तर या आंदोलनाच्या इशार्‍याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले. कोरोनाचे प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशासह महाराष्ट्रात 20 मार्च पासून लॉकडॉऊन सुरु आहे. 31 मे रोजी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचा शेवट झाला. केंद्रा प्रमाणे राज्य सरकारने देखील 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवत असतानाच मिशन बिगीन अगेन नवा आरंभ केले आहे.

यामध्ये राज्य सरकारने 1 जून पासून रेड व कंटेनमेंट झोन सोडून राज्यातील काही प्रमाणात दुकाने, उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र विडी विक्रीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे शहरातील विडी मालकांनी त्यांचे विडी कारखाने सुरु करुन विडी कामगारांना काम देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

दि.31 मे रोजी काढलेल्या आदेशामध्ये विडी कारखाने सुरू करू करणे किंवा विडी विक्री करणे याबाबत काहीच उल्लेख केलेला नाही. विडी कारखाने सुरु करण्यास व विडी विक्री करण्यास परवानगी आहे का नाही? याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

लॉकडाऊन काळामध्ये गेल्या सत्तर दिवसापासून विडी कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबातील लोकांची उपासमार होत आहे. शहरात 4 हजार विडी कामगार असून, ते आर्थिक दुर्बल घटक आहे. तर यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

राज्य सरकारकडे अनेकदा मागणी करुन देखील विडी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विडी कामगारांना केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही.

तरी विडी कामगारांच्या हाताला काम मिळावे, विडी विक्रीस परवनागी देऊन विडी कारखाने सुरु व्हावे, राज्य सरकारने विडी कामगारांना 10 हजार रुपये अनुदान मिळण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.बहिरनाथ वाकळे, संगिता कोंडा, कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, सरोजनी दिकोंडा, बुचम्मा श्रीमल, निर्मला न्यालपेल्ली, लक्ष्मी न्यालपेल्ली, शामला म्याकल, सुमित्रा जिंदम, लिला भारताल, शोभा बीमन, शमीम शेख, सगुना श्रीमल, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24