Ahmadnagar Breaking : पैशांच्या देवाण घेवाणीतून एकाचा मारहाणीत मृत्यू झाला. शुकवारी (दि. ५) दुपारच्या दरम्यान मानोरी येथे ही घटना घडली. याबाबत मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. ६) रात्री राहुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
गवजी बन्सी जाधव (वय ४५, रा. केंदळ खुर्द) असे मयताचे नाव आहे.घटनेतील मयत गवजी जाधव यांची पत्नी जया जाधव (वय ३९) या ५ जानेवारी रोजी मानोरी शिवारात खुरपणीचे काम करत होत्या.
दुपारच्या दरम्यान पती गवजी जाधव यांना रायभान एकनाथ बर्डे याने मारहाण केली. गवजी यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, अशी माहिती मिळाली. त्या ताबडतोब रुग्णालयात गेल्या मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गवजी जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी (दि. ६) पत्नी जया जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रायभान एकनाथ बर्डे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपी रायभान बर्ड याला अटक केली. या घटनेमुळे मानोरी व केंदळ खुर्द परिसरात खळबळ उडाली आहे.
संजाबाई पवार व सर्जेराव अंकुश जाधव हे दोघे दुपारी कामानिमित्त मानोरी येथे गेले होते. दुपारी काम संपवुन ते मानोरी येथील रायभान एकनाथ बर्डे याच्या घरासमोरुन जात असताना गवजी जाधव यांना रायभान बर्डे याने पैशांच्या देवाण घेवाणीवरून मारहाण केली.
हा सर्व प्रकार संजाबाई पवार व सर्जेराव जाधव यांच्या समोर झाला, यावेळी काही जणांनी गवजी जाधव यांना रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.