अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळला.
त्यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली.
या हत्या प्रकरणात पाच आरोपींना हत्येनंतर दोन दिवसांत पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र हत्येचा मास्टरमाईंड बाळ बोठे अद्याप फरार आहे.
बोठेचा अटकपूर्वचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता.
यावर आज सुनावणी होवून खंडपीठाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत.
तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसोर मोठे आव्हान आहे.
आता तो पोलिसांना शरण येतो की सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पसार आहे.
दरम्यान, जिल्हा न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर बोठे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली.