रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे चे मित्र आता पोलिसांच्या रडारवर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पोलिसांनी पुन्हा झाडाझडती घेतली. त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या घरातून रिव्हॉल्व्हर, पासपोर्ट, मोबाइलसह अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून फरार असलेला बोठे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेनंतरच जरे यांच्या हत्येचं गूढ उकलणार आहे. दरम्यान, पोलिसांनी बोठे याच्या नावाची लूकआऊट नोटीस जारी केली आहे. तसे पत्र जिल्हा पोलिस प्रशासनाने विमान प्राधिकरणास दिले आहे.

रेखा जरे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला ‘मुख्य सूत्रधार’ बाळ बोठे हा फरार झाला आहे. पण त्याला पळून जाण्यात मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आरोपी बाळ बोठे याने नियोजनपूर्वक पळून जाण्यात यश मिळवले.

पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली होती. तरी तो निसटला. त्याने मोबाईल घरीच ठेऊन पोलिसांना गुंगारा दिला. दरम्यान, शहर सोडून पळून जाण्यासाठी त्याला काहींनी मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुरूवार व शुक्रवारी जिल्हात व जिल्ह्याबाहेर काही ठिकाणी छापे टाकले.

मात्र तो गवसला नाही. बोठे याच्या अटकेनंतर जरे यांच्या हत्येची सुपारी कोणत्या कारणासाठी केली याचा उलगडा होणार आहे. पोलिसांच्या तपासात अनेक बाबी पुराव्यांसह हाती आल्या आहेत, असे समजते. पोलिसांनी हत्याकांडाशी निगडित ‘अन्य नाजूक’ बाबींचा अत्यंत सावधपणे तपास सुरू ठेवला आहे, असे समजते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24