अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
या डॉक्टरवर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा आहे. या प्रकरणात त्याने बोठेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात आले.
अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात शेळके याच्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके पोलिसांना सापडलेला नाही.
दरम्यान पोलीस २० ते २२ दिवसांपासून फरार बोठे याचा शोध घेत आहेत. बोठे हा पुणे येथे शेळके याच्याकडे लपला असल्याच्या संशयावरून पोलीस उपाधीक्षक अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला़ यावेळी शेळके सापडला आहे.
कोण आहे हा आरोपी ? :- या डॉक्टरच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्याप्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर नगरमध्ये सुरू केलेल्या एका मोठ्या रुग्णालयासाठी शहरातील विविध बँकांकडून त्याने कर्ज घेतले. मात्र, यामध्ये बँकांची आणि सहकाऱ्यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डॉक्टर महिलेसह चौकशीसाठी ताब्यात :- शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्याकांड करण्यात आली होती. २४ दिवसांपासून पासून हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार आहे, हत्याकांडा पासून बाळा बोठे फरार असल्याने त्याला मदत करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या हत्याकांडातील आरोपीला मदत केली म्हणून डॉक्टर महिलेसह चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
चौकशीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता :- डॉ. नीलेश शेळके याला नगर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात डॉ. नीलेश शेळके याच्याकडे सुरूवातीला चौकशी होणार आहे, अशी माहिती उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली आहे .आरोपीला पुणे येथून नगरला आणण्यात येत आहे. नंतर अधिक चौकशीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.