अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याच्या घराची व घरातच असलेल्या ऑफिसमध्ये आज पोलिसांनी तिसऱ्यांदा झाडाझडती घेतली.
याठिकाणी पोलिसांना काही ठोस पुरावे मिळाले आहेत. मात्र बोठे याचा अद्यापही ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिसांनी बोठे याच्या बाबत काही माहिती असल्यास ती आम्हाला द्या, असे थेट नागरिकांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आवाहन केले आहे.
पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात दि.३० नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे अद्यापही पसार आहे. बोठे याचा पोलीस सर्वत्र कसून शोध घेत आहेत. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली असून नगर जिल्ह्याच्या बाहेर देखील पथके पाठविण्यात आले आहेत.
मात्र अद्यापही बोठे पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी थेट नागरिकांना आवाहन केले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की,’आरोपी बोठे याच्या घरी व ऑफिसमध्ये आज आम्ही झाडाझडती घेतली. याठिकाणी काही ठोस पुरावे आम्हाला मिळाले आहेत. आरोपी बोठे बद्दल माहिती मिळवण्यास पोलीस प्रयत्नशील आहेत.
आम्ही विश्वास बाळगतो की लवकरात लवकर त्याला अटक करू. मात्र नागरिकांना देखील आमचे आवाहन आहे की याबाबत कुठलीही माहिती कोणाकडे असेल, तर निश्चित पोलिसांना द्या. या संदर्भातील जी गोपनीयता आहे, ती बाळगली जाईल.