अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- बेल्हेच्या आठवडे बाजारातून छोटी मोठी १६ जनावरे कत्तलखान्यात घेवून जाणारा टेम्पो सोमवारी दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांच्या हवाली केला.
पारनेर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधी शिवशंकर राजेंद्र स्वामी रा.पुणे यांनी दिली असून त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी अलम शरफ उद्दीन शेख (वय २६ वर्ष), जावेद हुसेन सय्यद (वय २७ वर्ष दोघेही रा.घोडेगाव ता.नेवासा जि.अहमदनगर) कत्तलीसाठी जनावरे विक्री करणारा व कत्तलीसाठी विकत घेणारा तसेच टेम्पो (क्र.एमएच ०९ ईएम ३४१७) अज्ञात मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधीची पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी बेल्हा येथील आठवडे बाजारातून बेकायदेशीर १६ छोटी मोठी जनावरे कत्तलखान्यात नेणारा टेम्पो नगर – कल्याण महामार्गावरुन जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली होती.
त्यामुळे संबंधित वर्णनाचा टेम्पो टाकळी ढोकश्वर येथील वासुंदे चौकात या कार्यकर्त्यांनी अडवून पाहणी केली असता. टेम्पो (क्र.एमएच ०९ ईएम ३४१७) यात लहान मोठी १६ जनावरे दाटीवाटीने कोंबून क्रूरपणे रस्सीने जखडून बांधून त्यांची कत्तल करण्यासाठी जनावरांची वाहतूक करताना मिळून आले आहेत.
याबाबत पारनेर पोलिसांना माहिती देत या जनावरांची सुटका करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पारनेर पोलिस करत आहेत.