कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. ही रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा चांगल्या काम करीत आहेत, मात्र, नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे.

बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांनी सक्तीने स्वताला विलगीकरण करुन घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात श्री. थोरात यांनी आज कोविड-१९ उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते

. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्री. थोरात यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, जिल्ह्यातील कोणत्या भागात रुग्ण वाढत आहेत आणि त्याची कारणे काय, बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भातील कार्यवाही आदींची त्यांनी माहिती घेतली.मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो.

मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विलगीकरण प्रक्रिया काटेकोरपणे राबविली गेली पाहिजे. प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी जसे प्रशासन घेत आहे, तशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. नागरिकांच्या मनावर ही बाब बिंबवली पाहिजे.

कोरोनाचे संकट लगेच संपणारे नाही, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संघटनांना कोरोनासह जगायला शिका, असे सांगत आहेत. नागरिकांनीही स्वताच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. आगामी काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता. मे आणि जून महिन्यात बाहेरुन येणारे नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा झटत आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या निर्णयाला नेहमीच पाठिंबा असल्याचे सांगून राज्य शासनही आवश्यक ती सर्व मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य पूर्वपदावर येण्यासाठी सर्वतोपरी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांचे जीवन हे सर्वांत महत्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टीला प्राधान्य देत ट्प्प्याटप्प्याने आपण व्यवहार सुरळीत करीत आहोत.

नागरिकांनीही वैयक्तिकरित्या या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी त्यांना कोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सध्या जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब झाल्यामुळे लक्षणे जाणवणार्‍या नागरिकांची चाचणी करण्याचा वेग वाढला आहे. तसेच, कन्टेन्मेंट झोनच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24