अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- हिरडगाव ता. श्रीगोंदा येथील भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ८२ हजार १६७ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
त्यामध्ये २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम व १३ तोळे ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रविवार २६ जुलै २०२० च्या रात्री बारा ते पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम २ लाख ३० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
भास्कर भुजबळ यांची मुलगी अश्विनी हिरडगाव येथील ईश्वर चिमाजी दरेकर यांना दिलेली आहे. ती सणाला माहेरी आलेली होती.
शनिवारी पंचमी सण असल्याने आपले सर्व दागिने गळ्यात घालून ती हिरडगाव येथील नागनाथाच्या दर्शनासाठी गेली होती. नागनाथ मंदिराच्या परिसरातच कोणीतरी तिच्या दागिन्यांवर पाळत ठेवून ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
चोरी केल्यानंतर चोरांनी भुजबळ वस्तीवरील एका वीटभट्टीजवळ दागिन्याची पर्स उचकून पाहिली. या पर्समध्ये काही बेन्टेक्सच्या बांगड्या पण होत्या.
दोन तोळ्याचा सोन्याचा हार देखील होता. बेन्टेक्सच्या बांगड्या आणि हार नकली समजून चोरट्यांनी पर्स जवळ टाकून दिला. अहमदनगरहून आलेल्या पथकाने चोराच्या मार्ग दाखवून दिला.
भास्कर आबासाहेब भुजबळ वय ५४ वर्षे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com