अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-भिंगार छावणी परिषदेच्या सोलापूर रोडवरील टोलनाक्यावरील दरोड्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन छावणी परिषद पोलिसांनी काल लॉरेन्स स्वामीला अटक केली. भल्या सकाळी सात वाजेपासून पोलिसांनी स्वामी याच्या पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
तथापि, स्वामी यास ताब्यात घेण्यास तब्बल पाच तास पोलिसांनाही वेटिंग करावे लागले. सोलापूर टोलनाक्यावर 20 नोव्हेंबरला दरोडा पडला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत टोल नाका चालविणारे व्यवस्थापक अजय शिंदे, कर्मचारी हनुमंत देशमुख व रोखपाल सचिन पवार गंभीर जखमी झाले होते.
त्यावेळी दरोडेखोरांनी गल्ल्यातील तब्बल 50 हजार रुपये देखील लंपास केले होते. या संदर्भात भिंगार छावणी परिषद पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्वामीला पकडण्यासाठी पाेलिस सकाळी ६ वाजताच त्याच्या घरी दाखल झाले.
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्येतील मुख्य सूत्रधार बाळ बाेठे स्वामीच्या घरात लपला आहे. त्याला पकडण्यासाठीच पाेलिस आले असल्याची अफवा शहरात पसरली. आठ दिवसांपासून फरार असलेला बाेठे पाेलिसांच्या हाती लागेल आणि हत्येचे गूढ समाेर येईल, असे वाटत हाेते.
त्यामुळे तब्बल ८ तास चाललेल्या या कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले हाेते. मात्र, ही कारवाई बाेठे याला पकडण्यासाठी नव्हती, तर स्वामीला पकडण्यासाठीच हाेती. लाॅरेन्स स्वामी हा काही वर्षांपासून एका राजकीय पक्षाचा व जिल्हा फुटबाॅल असाेसिएशनचा पदाधिकारी आहे.
तीन वर्षांपूर्वी याच टाेलनाक्यावर खंडणी वसूल करणाऱ्या टाेळीला गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी जेरबंद केले हाेते. या प्रकरणातदेखील स्वामीचे सहआराेपी म्हणून नाव आले आहे. तेव्हादेखील ताे फरार हाेता.