ब्रेकिंग

जळगावात सैराट ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तीन वर्षांनंतर घेतला जावयाचा बदला

Published by
Sushant Kulkarni

२१ जानेवारी २०२५ जळगाव : प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू होता.तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (२६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर धारदार कोयता व चॉपरने वार केले.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले.ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली.

जखमींमध्ये मयत तरुणाच्या भावासह काका, काकू, चुलत भाऊ व बहिणीचा समावेश आहे.याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.जळगावात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती या घटनेने झाली आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात मुकेश शिरसाठ हा तरुण आई, वडील, भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता.तीन वर्षांपूर्वी त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या पूजा नामक तरुणीशी प्रेमविवाह केला,तेव्हापासूनच शिरसाठ कुटुंबीय व तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू आहे.रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला.

त्यावेळी पूजाचे काका सतीश केदार, भाऊ शंकर सोनवणे, बाबा भुताजी बनसोडे, बबलू बनसोडे, चुलत भाऊ राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, आतेभाऊ अश्वीन सुरवाडे, विक्की गांगले, बबल्या गांगले यांच्यासह इतर दोन अनोळखी त्याठिकाणी आले.

‘तुला जास्त माज आला आहे, तू पूजाशी पळून जाऊन लग्न केले आहे.तुला व तुझ्या परिवाराला या पूर्वी सोडून दिले.आता संपवून टाकू,’असे मुकेशला म्हणत त्यांनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केले.त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असताना मृत्यू झाला.

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणारे मयताचे काका नीळकंठ सुकदेव शिरसाठ, काकू ललिता नीळकंठ शिरसाठ, चुलत भाऊ सनी शिरसाठ (२१), करण शिरसाठ (२५), चुलत बहीण कोमल शिरसाठ यांच्यावर पूजाचे काका सतीश केदार व इतरांनी शिवीगाळ करून कोयता तसेच चॉपरने हल्ला केला.

यामध्ये त्यांच्या डोक्याला, मानेला, पाठीवर, पायाला गंभीर दुखापत होऊन वरील सर्व जण जखमी झाले.त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.वरील सहा जणांसह सुरेश भुताजी बनसोडे (५०) हेदेखील जखमी झाले.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni