संगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या एका खाजगी कंपनीच्या दोघाना वडगाव लांडगा शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रक्कम लुटून पोबारा केल्याची घटना काल 10 जानेवारी रोजी दुपारी घडली.

संगमनेरच्या कॉर्पोरेशन बँकेतून 26 लाख आणि बँक ऑफ बडोदातून 10 लाख अशी एकूण 36 लाख रुपयांची रोख रक्कम काढून सिस्को कंपनीचे एटीएम चालविणारे कर्मचारी मंगेश रमेश लाड (रा.चास नळवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक) व दत्ता सोनू पांडे (रा.घुलेवाडी,ता.संगमनेर) मोटारसायकल क्रमांक एमएच 17 बीबी 5607 हिच्यावरुन वडगाव लांडगा येथील एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी राजापूरमार्गे जवळे कडलग ते वडगाव लांडगा रोडने जात होते.

बंदुकीचा धाकाने रोख रक्कम चोरुन पोबारा …

वडगाव लांडगा शिवारात ते आले. त्यावेळी एका वाहनातून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्याजवळ गाडी थांबवत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन पोबारा केला आहे.

अज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा.

या दरोडेखोरांना पकडण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यात नाकाबंदीही करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. याप्रकरणी मंगेश रमेश लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24