संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील महालवाडी येथे शेतजमीन व रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महालवाडी या ठिकाणी देवनाथ विठोबा मिंडे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.
त्यांच्यात व शेजारी असलेले लक्ष्मण धोंडीबा मिंडे, बाळासाहेब लक्ष्मण मिंडे या सर्वांमध्ये शेतजमीन व रस्त्याचा वाद आहे.
रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मिंडे व त्यांचा मुलगा संतोष हे शेताच्या बांधावर उभे होते. त्यावेळी वरील दोघे त्या ठिकाणी आले.
ते म्हणाले, तुम्ही आमच्या शेतजमिनीच्या रस्त्यातून जायचे नाही, असे म्हटल्यानंतर देवनाथ मिंडे व इतर लोक त्यांना समजून सांगण्यास गेले असता त्यावेळी वरील दोघांना राग आल्याने त्यांनी शिविगाळ, दमदाटी केली.
तसेच बाळासाहेब याने देवनाथ मिंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांचा मुलगा संतोष हा सोडविण्यासाठी गेला असता बाळासाहेब याने संतोषलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी लक्ष्मण मिंडे याने देवनाथ मिंडे याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला.