वीजवाहक तार अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या भोईटे मळा येथे प्रवीण लक्ष्मण सुपेकर (वय २७) या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीजवाहक तार तुटून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तसेच त्याला वाचविण्यासाठी गेलेली त्याची चुलतीही तारेला चिटकली होती, पण तिच्या मुलाने हातावर काठी मारून आपल्या आईला वाचवले आहे.

ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण सुपेकर हा तरुण शेतकरी आपल्या आई-वडिलांसोबत खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या भोईटे मळा या ठिकाणी राहत होता.

सध्या पेरण्यांचे दिवस सुरू असल्याने रविवारी दुपारी प्रवीण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीत रोटाव्हेटर मारत होता. त्याच दरम्यान शेजारुन गेलेली वीजवाहक तार तुटून थेट प्रवीणच्या अंगावर पडली. शेजारीच त्याची चुलती सुनीता तुकाराम सुपेकर या शेतात काम करत होत्या.

त्यांनी तार पडल्याचे पाहून प्रवीणला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याही वीजवाहक तारेला चिटकल्या. हे बघून त्यांचा मुलगा रमेश याने आपल्या आईला व चुलत भावाला वाचवण्यासाठी काठी घेवून त्यांच्या दिशेने धाव घेतली.

काठीने आईच्या हातावर जोराने मारले. दैवबलवत्तर असल्याने आई बालंबाल बचावली आहे, तर प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.प्रवीणच्या अंगावर वीजवाहक तार पडून त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती काहींनी मोबाइलवरून घारगाव पोलिसांना दिली. माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश मोहिते व वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता आशिष रणदिवे, मुख्य हवालदार दशरथ वायाळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर प्रवीणचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस पाटील कुंडलिक साळुंके यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24