अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील किराणा दुकानात चोरी करून त्याच गावातून एक दुचाकी चोरून नेणारा चोरटा चिंगळ्या टवक्या काळे (वय ४० रा.टुलेवस्ती, वांगदरी) याला श्रीगोंदा गुन्हे प्रगटीकरणं शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालातील एक तेलाचा भरलेला डबा, एक रिकामा डबा, एक युनिकॉर्न दुचाकी असा एकूण ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आह.े सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १९ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. दि.१ ते ११डिसेंबरच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील देविदास ठोबरे यांच्या मालकीच्या सुनीता किराणा दुकानातून किराणा मालाची चोरी झाली होती.
त्याच गावातील अमोल धावडे यांच्या मालकीची युनिकॉर्न दुचाकी चोरीला गेली होती. या बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सदरची चोरी ही वांगदरी गावातील टुलेवस्तीवर राहणारा चिंगळ्या टवक्या काळे याने केल्याची माहिती तपासादरम्यान पोलीस पथकास मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सदर चोरट्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी काळे याच्या घरातून मुद्देमाल हस्तगत केला आहे.